Ajit Pawar vs Anjali Damania: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती. त्यांचे हे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले. मात्र, या वादात आता अंजली दमानिया यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच इशारा दिला आहे.
अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. पुणे कार अपघातातील आरोपींना वाचवण्यासाठी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केले, असा खळबळजनक आरोप दमानियांनी केला. विशेष म्हणजे अजित पवारांनीही दमानियांचं हे चॅलेंज तत्काळ स्वीकारलं. नार्को टेस्टला तयार आहे. मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत तर दमानियांनी संन्यास घ्यावा, असा प्रतिआव्हान अजितदादांनी दिलं. दमानियांनीही हे आव्हान लगेचच स्वीकारलं.
त्यानंतरही गप्प बसतील त्या अंजली दमानिया कुठल्या? अजित पवारांनी मल्टिपल कॉल्स का केले, हे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी उघड करावं... अन्यथा अग्रवाल कुटुंबाचे आणि अजितदादांचे काय संबंध आहेत, याचे पुरावे दोन दिवसात बाहेर काढू, असा इशाराच दमानियांनी दिला आहे.
दमानिया यांनी थेट अजित पवारांनाच टार्गेट केल्यानं राष्ट्रवादीनंही दमानियांच्या विरोधात आघाडी उघडलीय. झी २४ तासच्या चर्चेत दमानिया आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आमनेसामने आले, तेव्हा चांगलीच खडाजंगी उडाली... दमानिया विरुद्ध राष्ट्रवादी सामन्याला आता दादा विरुद्ध दमानिया असं स्वरूप आल्यानं वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.
पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे अपघात प्रकरणाच्या तपासाची माहिती त्यांनी यावेळी अजित पवार यांना दिली. अमितेश कुमार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तपासातल्या प्रगतीची माहिती दिली. गेल्या आठवड्यात अजित पवार पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात कुणालाच पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं होतं. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्तांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्याचंही त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांना तपासाबाबत माहिती दिली.