माणसांसारख्याच प्राण्यांनाही आईसाठी संवेदना असतात, हे या माकडाच्या पिल्लानं दाखवून दिलंय

  आई ही प्रत्येक व्यक्तीच्या सर्वात जवळची व्यक्ती असते. आई इतकं तिच्या मुलाला कोणीही समजू शकत नाही.

Updated: Aug 4, 2021, 09:31 PM IST
माणसांसारख्याच प्राण्यांनाही आईसाठी संवेदना असतात, हे या माकडाच्या पिल्लानं दाखवून दिलंय

विशाल करोळे, औरंगाबाद :  आई ही प्रत्येक व्यक्तीच्या सर्वात जवळची व्यक्ती असते. आई इतकं तिच्या मुलाला कोणीही समजू शकत नाही. त्यामूळे आई गेली की, त्याचं सगळ्यात जास्त दु:ख होतं ते तिच्या मुलांना. औरंगाबादच्या नागापूर गावातलं मन हेलावणारं एक घटना घडलं. येथे एका मादी माकडाचा विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तिच्यासोबत तिचं पिल्लूही होतं. त्याने पाहिले की, त्याची आई जमिनीवर निपचित पडली आहे. हे पाहिल्यानंतर आपल्या आईला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे माकडाचं पिल्लू करत होतं.

आजुबाजूला लोक जमली तरी हे पिल्लू आपल्या आईच्या बाजून हटायला काही तयार नव्हतं. ते आपल्या आईला कवटाळून तिथंच बसून राहिलं. हे पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यातही पाणी आलं. तब्बल तास-दोन तास सगळेच खिन्न मनानं ते दृश्य पाहत होते.

अखेर कसंबसं गावकऱ्यांनी पिल्लाला बाजूला केलं आणि माकडिणीवर अंत्यसंस्कार केले. आता पिल्लाचं काय होणार?  याचं दुःख माकडिणीला शेवटचा निरोप देताना सर्वांनाच होतं.

आपल्या आईवर सुरू असलेले अंत्यसंस्कार पिल्लू दुरूनच पाहत होतं. आई गेल्याचं त्याचं दुःख सगळ्यांनाच समजत होतं. पिल्लाची आईसाठीची ही तळमळ आणि तडफड सगळ्यांच्याच हृदयाला घर करून गेली.