'भुजबळांशी चर्चा करुन...', मनोज जरांगे यांच्या उपोषणावर फडणवीसांचं मोठं विधान, 'मागच्या काळात...'

Devendra Fadnavis on Manoj Jarange: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला धक्का बसल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2024, 12:15 PM IST
'भुजबळांशी चर्चा करुन...', मनोज जरांगे यांच्या उपोषणावर फडणवीसांचं मोठं विधान, 'मागच्या काळात...' title=

Devendra Fadnavis on Manoj Jarange: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला असून, आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचाही (Maratha Reservation) महायुतीला फटका बसला आहे. त्यातच आता मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं असून राज्य सरकारकडे आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तसंच जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे करणार. तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार असा थेट इशाराच दिला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनावर भाष्य केलं आहे. 

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यांची मागणी आहे त्याबाबतदेखील सरकारने पहिला नोटिफिकेशन जारी केलं असून त्यावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

दरम्यान आपण छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. "मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिलं आहे असंही ते म्हणाले आहेत.