चतूर... चाणाक्ष आणि विक्रमी फडणवीस!

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हा फडणवीसांच्या पाच वर्षांतल्या धडाडीचा कळसाध्याय ठरला

Updated: Jul 3, 2019, 09:09 PM IST
चतूर... चाणाक्ष आणि विक्रमी फडणवीस! title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एक विक्रम होतोय. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्रातले फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत. पाच वर्षांचा काळ फडणवीसांसाठी आव्हानात्मक होता. पण त्यांनी सगळी आव्हानं प्रचंड ताकदीनं पेलली.

३१ ऑक्टोबर २०१४... 'मी देवेंद्र गंगाधर फडणवीस, शपथ घेतो की...' म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली... आणि आता सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरत आहेत. अवघ्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे शरद पवारांनंतरचे फडणवीस पहिले तरुण नेते... त्यांच्या निवडीवर चर्चेचं गुऱ्हाळ चालवणाऱ्या राजकीय पंडितांचे अंदाज खोटे ठरवत फडणवीसांनी पाच वर्षं सिंहासन नुसतं सांभाळलं नाही तर गाजवलं... 

सत्तेत असलेली शिवसेना सातत्यानं ५ वर्षं हल्लाबोल करत होती... पण चतुर चाणाक्ष फडणवीसांनी शिवसेनेशी लढाही दिला आणि दुसरीकडे युतीही तुटू दिली नाही. विशेष म्हणजे शिवसेनेच्या स्थापना दिनाला हजेरी लावणारे ते पहिले मुख्यमंत्री...

विदर्भाचे मुख्यमंत्री अशी सुरुवातीला टीका होऊनही मुख्यमंत्र्यांनी अख्ख्या राज्याची मोट व्यवस्थित बांधली. स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सांभाळणं, सतत टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला हाताळणं आणि त्याचवेळी विरोधकांना निष्प्रभ करणं आणि शेवट़ी शेवटी तर विरोधी पक्षनेत्यालाच भाजपात आणणं, हा करिष्मा फडणवीसांनी करुन दाखवला. 

वेगाने काम करण्याचा हातखंडा, स्वच्छ प्रतिमा, हजरजबाबीपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं हाताळण्याची उत्तम कला यांच्या जोरावर फडणवीसांनी गेल्या पाच वर्षांत कमाल करुन दाखवली... अनेक मोर्चे आणि आंदोलनं भडकली... पण फडणवीसांनी ती यशस्वीपण परतवली... 

याच वर्षांमध्ये फडणवीसांचं कुशल नेतृत्व अधोरेखित झालंय. उत्सुकता आहे ती विधानसभा रणसंग्रामाची... मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हा फडणवीसांच्या पाच वर्षांतल्या धडाडीचा कळसाध्याय ठरला. 

'मी पुन्हा येईन' असं म्हणत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्धारच व्यक्त केलाय, असं म्हणायला हरकत नाही.