किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती

किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने खळबळ उजाली होती. वडिलांच्या कानाखाली मारल्यानं हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्ररकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 24, 2023, 04:32 PM IST
किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती title=

Kishor Aware Murder Case : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishore Aware) यांची 14 मे 2023 रोजी भरदिवसा हत्या झाली.  तळेगाव (talegaon) नगर परिषदेच्या परिसरात किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. राजकीय द्वेषातून ही हत्या झाल्याचे उघड झाले होते. या हत्या प्रकरणी माजी नगरसेवक भानू खळदेंचा मुलगा गौरवला याप्रकरणी अटक करण्यात आली. वडिल्यांच्या कानाखाली मारली म्हणून बदला घेण्यासाठी हत्या केल्याचं धक्कादायक कारण पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर आता  किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली याचा देखील खुलासा झाला आहे. किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती लागला आहे. 

असा आहे मास्टरप्लान

मावळ तालुका हादरवून सोडणाऱ्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली हे आता समोर आले आहे. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाईल अशी बोलणी झाल्याचं सांगत आरोपींनी माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग फोडलं आहे. 

हत्येपूर्वी  अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले होते दहा लाख

भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिले होते. हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून लागेल तेव्हा देण्यात आले होते. खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. 

भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे हा जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी बनविण्यात आलं असून त्यांचा शोध सुरु आहे. मात्र ,भानू पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलीसांचे दोन पथके भानू खळदेच्या मागावर आहे. भानू पोलिसांच्या हाती लागल्यावर आवारे खून प्रकरणातील अनेक खुलासे बाहेर येतील. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आवारे यांच्या आईने केले होते गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप मृत किशोर आवारे यांच्या आईनं केला होता. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात आमदार शेळकेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर, संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.