Lok Sabha Election Survey: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरीही आतापासूनच सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपानेही (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी धोरण आखलं असून एकहाती सत्ता मिळवण्याचे दावे केले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात शिंदे गट (Eknath Shinde) स्थापन झाल्यापासून राजकीय गणितं बदलली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील फुटीचा मोठा प्रभाव दिसू शकतो. दरम्यान, राज्यात आजच्या घडीला निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वरचढ ठरेल की, भाजप प्रणित एनडीए (NDA) याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये आलेला निकाल भाजपाची चिंता वाढवणारा आहे.
इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडील एकूण 34 जागा मिळू शकतात. तर एनडीएला (भाजप, शिंदे गट आणि RPI) ला फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ एकूण मतदानाच्या 48 टक्के मतं युपीएला मिळतील.
आजच्या घडीला निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असं सर्व्हेतून समोर येत आहे. मात्र भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेंनी पक्षांतर्गत बंड पुकारत आमदारांना घेऊन आधी सूरत आणि आणि नंतर गुवाहाटी गाठली होती. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाताच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचं जाहीर केलं होतं.
30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आलं.
या सर्व्हेनुसार, देशातील निकाल मात्र भाजपाला दिलासा देणारा आहे. आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला 284 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असून तब्बल 72 टक्के लोक त्यांच्या कामावर समाधानी असल्याचं समोर आलं आहे.