4 Dec 2024, 08:39 वाजता
येरवाडा तुरुंगातील कैद्याने दिली राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा
पुणे येरवडा कारागृहातून कैदी असलेल्या आरोपीने राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिली आहे. जामीन अर्ज प्रलंबित होता मात्र कैद्याची जिद्द बघून जुन्नर न्यायालयाने परीक्षा देण्याचा आदेश पारित केला. पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयानचे आदेश दिला होता. जितेंद्र पांडुरंग घोलप असे या कैद्याचे नाव असून त्याने वाघोली येथील केंद्रावर पोलिस बंदोबस्तात पूर्व परीक्षा दिली आहे.
4 Dec 2024, 08:37 वाजता
'या' 3 बँकांच्या ग्राहकांना मोबाईलवरील सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका; धक्कादायक अहवाल समोर
भारतीयांच्या मोबाइलवर सध्या जगात सर्वाधिक हल्ले होत असून, याद्वारे खासगी माहिती चोरण्यासह आर्थिक गंडाही घातला जात आहे. 'जेडस्केलर थ्रेटलॅब्ज 2024 मोबाइल, आयओटी अँड ओटी थ्रेट' अहवालात समोर आले आहे. 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. स्पायवेअर हा मालवेअरचा एक प्रकार आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याच्या नकळत मिळवली जाते. मोबाइल स्पायवेअर मालवेअर हल्ल्यांमध्ये 29 टक्के वाढ झाली असून यात मुख्य हेतू हा आर्थिक फसवणुकीचा असतो. थ्रेटलॅब्ज विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिससारख्या प्रमुख भारतीय बँकांच्या मोबाइल ग्राहकांना लक्ष्य करून फिशिंग केले जात आहे. या बँकांच्या ग्राहकांवरील हल्ले वाढले आहेत. बँकिंग संदर्भातील सायबर हल्ल्यांमध्ये 111 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अभ्यासात गुगल प्ले स्टोअरवर 200 पेक्षा अधिक असे अॅप्लिकेशन्स आढळून आले आहेत, जे मोबाईल सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत.
4 Dec 2024, 07:55 वाजता
सकाळी साडेसातच्या सुमारास गडचिरोलीला भूकंपाचे धक्के; चंद्रपूरही हादरलं
गडचिरोलीमध्ये सकाळी 7.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दक्षिण गडचिरोलीत नागरिकांना या भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण भारतात असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. चंद्रपूर शहरात देखील नागरिकांनी भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले.
4 Dec 2024, 07:48 वाजता
अजित पवार अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत; मात्र मागील दोन दिवसांपासून...
अजित पवार आज सकाळी मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, अमित शाहांच्या भेट व्हावी यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अजित पवारांची दुसरा दिवसही भेटीशिवाय गेला. महायुती सरकारचा शपथविधी जवळ येऊन ठेपलेला असताना अजित पवार आपल्या मागण्या घेऊन दिल्लीत गेले असून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्या मागण्या भाजपचे वरिष्ठ नेते मान्य करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 Dec 2024, 07:13 वाजता
महाराष्ट्राच्या राजकारणात आज या 8 महत्त्वाच्या गोष्टी घडणार?
> भाजप पक्ष निरीक्षक ताज प्रेसिडेन्टमधून 9 वाजता निघतील.
> भाजप पक्ष निरीक्षक विधानभवनात 10 पर्यंत पोहचतील.
> 10 वाजता भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक होईल.
> 11 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होईल.
> विधीमंडळ गटनेता निवडीनंतर भाजपची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
> भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांना भेटतील.
> साडेतीन वाजता महायुतीचे नेते पक्ष निरीक्षक राज्यपालाकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील.
> महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होईल अशी शक्यता.
4 Dec 2024, 07:10 वाजता
हार्बर मार्गावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल
हार्बर मार्गावरील वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.10 वाजता पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.45 वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल. कुर्ता-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल.
4 Dec 2024, 07:08 वाजता
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यरात्रीनंतर 12 विशेष लोकल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ता-परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 1.05 वाजता पोहचेल. कल्याण-परळ लोकल कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.15 वाजता पोहोचेल. ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून रात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.55 वाजता पोहोचेल. परळ-ठाणे लोकल परळ येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री 1.55 वाजता पोहोचेल. परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून रात्री 2.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल.
4 Dec 2024, 07:05 वाजता
आझाद मैदान परिसरात 5 हजार पोलीस तैनात
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त करत अभूतपूर्व यश संपादन केले. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, 5 डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मुंबई महानगरपालिका मार्गावरील आझाद मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे 5 हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात राहणार असून त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, 2 दंगल नियंत्रण पथक, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार आहेत.
4 Dec 2024, 07:04 वाजता
बेस्ट उपक्रमाकडून महापरिनिर्वाण दिनी विशेष बस सेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.
4 Dec 2024, 07:02 वाजता
मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारा! थंडीची प्रतिक्षा कायम
काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या असून मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती. उपनगरांतील किमान तापमान नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून 20 अंशाखाली नोंदले जात होते. यामुळे रात्री, तसेच पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. तसेच वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी 24.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.