यवतमाळ: अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेणाऱ्या यवतमाळच्या मार्लेगाव येथील शेतकरी श्यामराव रामा भोपळे यांचा अखेर मृत्यू झाला आहे. ६ मे रोजी पहाटे त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटऊन घेतले होते. त्यानंतर ९० टक्के भाजलेल्या शामराव यांचेवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. ७ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली.
उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी श्यामराव रामा भोपळे यांचेकडे ५६ गुंठे शेतजमीन असून त्यांचेवर सहकारी सोसायटीचे १७ हजार ३६० रुपयांचे कर्ज होते. ३० जून २०१७ रोजी त्यांचे कर्ज थकीत झाले त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असे कुटुंबीयांनी सांगितले.
भोपळे यांनी शेतात यावेळी सोयाबीन तूर व चणा ही पिके घेतली, दुष्काळी स्थितीने उत्पन्नात मोठी घट आली शिवाय शेतमालाला योग्य भाव देखील मिळाला नाही. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा याची त्यांना चिंता आहे. आणि या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केली. याच उमरखेड तालुक्यात १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचे दत्तकगाव असलेल्या सावळेश्वरमध्ये माधव रावते या शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली होती.