महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीत असून, ते भाजपात सहभागी होणार की नाही याबाबत राज्यात प्रचंड उत्सुकता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील असून, हा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामागे भाजपाचा आग्रह कारणीभूत ठरु शकतो.
दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. राज ठाकरे यांनी मात्र या मागणीवर काय प्रतिक्रिया दिली आहे हे समजू शकलेलं नाही. पण तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील. दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील.
राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये लवकरच सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
राज ठाकरे सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून, सतत भेटीगाठी सुरु आहेत. राज ठाकरेंनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. त्याआधी हॉटेलमध्ये विनोद तावडे त्यांच्या भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात अर्धा तास बैठक सुरु होती. या भेटीनंतर राज ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. दरम्यान राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा, हिंदुत्वाचा आणि पक्ष हिताचा निर्णय घेतील असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत सुरु असलेला तिढा मिटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामराजे निंबाळकर यांनी महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला आहे. अजित पवार आणि फडणवीस यांच्यासह झालेल्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला आहे. महादेव जानकर यांनी फडणवीस महायुतीमधील उमेदवारास सहकार्याची भूमिका घेतली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकरांनी नाराज झाले होते, त्यांनी उघडपणे रणजितसिंहांना विरोध केला होता. त्यानंतर गिरीश महाजनांनी मोहितेपाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता रामराजे निंबाळकर-रणजितसिंह निंबाळकर यांच्यात फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती.