शरद पवार ईडी चौकशीवर मुख्यमंत्री म्हणालेत, 'सूड उगविण्यासाठी कारवाई नाही'

'बदला घेण्यावर कारवाई केली जात नाही.'

Updated: Sep 25, 2019, 05:04 PM IST
शरद पवार ईडी चौकशीवर मुख्यमंत्री म्हणालेत, 'सूड उगविण्यासाठी कारवाई नाही' title=

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवारांसह तब्बल ७० जणांवर ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकारण जोरदार तापले आहे. शरद पवार यांच्याविरोधात ईडीच्या चौकशीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बदला घेण्यावर कारवाई केली जात नाही.' आज आम्ही सत्तेत आहोत, उद्याही येणार आणि पुढे महायुतीची  सत्ता येणार, असे  फडणवीस  म्हणालेत. ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यात राज्य सरकारचा हात नाही. हे प्रकरण आधीचे आहे. त्यामुळे सूड घेण्यासाठी हे होत नाही, असे ते म्हणालेत.

दरम्यान, २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. शरद पवारांनीच याबाबत घोषणा केली आहे. ईडीला पूर्ण सहकार्य करणार आणि त्यांचा पाहुणाचारही घेणार, असा जोरदार टोलाही पवार यांनी लगावला. त्याचवेळी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही. आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आहे, हे सांगायलाही शरद पवार विसरले नाही. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांचा हा गेम प्लॅन सुरू झाला. 

सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाणुनबुजून ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे.  मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली. पक्षांतराबाबत आपण नितीन गडकरींच्या भूमिकेशी सहमत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तरीही १६०पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे भाकितही त्यांनी केले आहे.