Kojagiri Purnima Bhulabai in Vidarbha : भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपर्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
आश्विन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. ही पौर्णिमा मोठ्या थाट्या माट्यात साजरी करण्यात येते. महाराष्ट्रतील विदर्भात कोजागरी पौर्णिमेला एक वेगळाच आणि अनोखा उत्साह पाहिला मिळतो. त्या उत्साहाला म्हणतात भुलाबाईचा उत्साह...विदर्भासह मराठवाडय़ाच्या काही जिल्ह्यात खान्देशातील जळगाव जिल्ह्यात साजरा केला जातो. पण भुलाबाईचा उत्साह विदर्भात मोठा असतो. भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा केला जातो. विदर्भात कोजागरीला माळी पौर्णिमे असं म्हटलं जातं.
भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. एक महिन्याकरिता ती आपल्या माहेरी येते. तिचा हा सण, भुलाबाईसोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. शेतकरी घरांमध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलींमध्ये ओळखला जातो. भुलाबाईचा हा उत्सव वैदर्भीय लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभ्यंग ठेवा आहे. भुलाबाईचा हा उत्सव विदर्भात पारंपरिक बालमहोत्सव म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे.
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. 16 वर्षाखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते.
भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात.
सासुबाई-सासुबाई मला मूळ आलं
जाऊ द्या मला माहेरा-माहेरा
कारल्याची बी पेर गं सुनबाई
मग जा आपल्या माहेरा-माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासुबाई
आता तरी जाऊदया माहेरा
माहेराभुलाबाईच्या गरीब स्वभावाचा सासू कसा फायदा उचलते हयाचे उदाहरण या गीतातून दिसते. तर हया सगळया त्रासाला कंटाळून जेव्हा भुलाबाई रूसून बसते तर सासरची मंडळी तिला कसे मनवतात ते ही यापुढील गीतातून आपल्याला दिसते.
यादवराया राणी रूसून बैसली कैसी
सासुरवास सोसून घरात येईना कैसी
सासु गेली समजावयाला चला चला
सुनबाई आपल्या घराला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
पाटल्यांचा जोड नको मला
मी नाही यायची तुम्हच्या घराला
एकंदरीत भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा आहे.