Maharashtra Weather News : शनिवार आणि रविवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप सुरु असतानाच जुलै महिन्याची सुरुवात मात्र वरुणराजाच्या दमदार हजेरीनंच होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 4,5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवली आहे. ज्या धर्तीवर अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
विदर्भात 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता असून इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
राज्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा 54 टक्के पाऊस झाला असून, हे प्रमाण अतिशय कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, अशा सर्वच विभागांतही पावसाचं प्रमाण समाधानकारक नाहीच. 11 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल झाला आणि 23 जूनपर्यंत तो तिथंच रेंगाळला. पुढे तो विदर्भात दाखल झाला आणि त्यानंतर मुंबई पुण्यासह राज्याच्या उर्वरित भागांना व्यापलं. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूननं जोर धरला खरा. पण, जूनची सरासरी मात्र त्यानं भरून काढलेली नाही ही बाब नामकारता येत नाही.
सध्याच्या घडीला जुलै महिन्याची सुरुवात तरी समाधानकारक असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सोमवारी रत्नागिरीसह कोकणाचा दक्षिण पट्टा, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगडमध्येही पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पुण्यात पावसाचा यलो अलर्ट असेल. तर, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावरी, वर्धा, नागपूर या भागांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये देशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास बिहार, उत्तर प्रदेशासह देशाच्या उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असं सांगण्यात आलं आहे. तर, तामिळनाडूच्या किनारपट्टी भागाला पावसाचा तडाखा बसेल. उत्तराखंडमध्येही हवामान सातत्यानं बदलणार असून, हिमाचलच्या काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत होताना दिसेल.