'तुमच्या मनात आहे ते होईल'; मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे संकेत

Maharashtra Politics : फक्त उपमुख्यमंत्री होण्यासाठी ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत का असा प्रश्न अजित पवारांना अनेकदा विचारला जातो. मात्र आता कार्यकर्त्यांनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Updated: Nov 30, 2023, 08:39 AM IST
'तुमच्या मनात आहे ते होईल'; मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे संकेत title=

Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या समर्थकांनाही दादांना मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मातोश्रींनीही हीच गोष्ट बोलून दाखवली होती. त्यानंतर आता कर्जतमधल्या (Karjat) सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. आधी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे (CM) संकेत दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) रायगडमधील कर्जतमध्ये बुधवारी निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे कार्यकर्त्यांकडून सातत्याने म्हटलं जात आहे. यावर आता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या संकेतामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

कर्जत इथल्या सभेत भाषण करत असताना काही तरुण खालून घोषणा देत होते. यावर बोलताना "आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल", असे अजित पवार म्हणाले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाबाबतच संकेत दिले असं म्हटलं जात आहे.

डेंग्यूबाबतही भाष्य

अजित पवारांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना? असा सवाल सातत्याने विचारला जात होता. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मला डेंग्यू झाला, तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली. पण मी असा काही मी लेचापेचा माणूस नाही. जे आहे, ते तोंडावर आहे," असे अजित पवार म्हणाले.

विचार पटले नाही तर चर्चा व्हायला हवी - अजित पवार

"महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांना आपला हक्क आणि म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण आपली भूमिका मांडत असताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, वाद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी भूमिका मांडली जात आहे. आदिवासी, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. पण सर्व पक्षांची बैठक घेतली आहे, सर्वांनी एकमताने सांगितलं आहे की, सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. मतमतांतरे असतील. विचार पटले नाही तर चर्चा व्हायला हवी", असंही अजित पवार म्हणाले.