प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

राजीव कासले | Updated: Jul 19, 2024, 02:39 PM IST
प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्मातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची (National Highway) ओळख आहे. आलापल्ली ते भामरागड या 130-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आलं. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने गेल्या दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका इथल्या नागरिकांना बसतोय.

गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेलं
याचा फटका बसला तो गरोदर महिलेला (Pregnant Woman). भामरागड तालुक्यातील कुडकेली इथल्या झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने ती रुग्णालयासाठी निघाली. मात्र रस्ता वाहून गेला असल्याने तिला पुढे जाता आले नाही. त्यावेळी रस्ता कामावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या (JCB) बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट बनते याची प्रचिती येते.

शाळा-वसीतगृहात शिरलं पाणी
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सूर्यापल्ली गावातल्या मॉडेल शाळा वसतीगृहात तलावाचं पाणी शिरल्यामुळे मध्यरात्री गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. शाळेच्या वसतीगृहात तीन ते चार फूट पाणी वाढलं. रात्री साडेअकरा वाजेपासून तलावातील पाणीपातळीत वाढ होत तलाव ओसंडून वाहू लागला. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने जवळपास 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं. या विद्यार्थ्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयमध्ये सुरक्षित हलविण्यात आलं. सिरोंचा तालुकास्थानापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्यापल्ली गावात जवळपास 14 घरांमध्येही तलावाचे पाणी शिरलं आहे.  सध्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अलर्ट असून मुसळधार पाऊस सुरू आहे.

भामरागडमध्ये मुसळधार पाऊस
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाने भामरागड-आलापल्ली या मार्गावरील रस्ता वाहून गेल्याने  वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. तासगाव, कुडकेली नाला अशा अनेक नाल्यांवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरते वळण मार्ग तयार करण्यात आले होते. मात्र ते पावसामुळे वाहून गेल्याने भामरागडचा संपर्क तुटला होता.

चंद्रपूरातही अतिमुसळधार पाऊस
पर्जन्य सरासरीचा बॅकलॉग असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली.  जिल्ह्यात जून आणि जुलै या महिन्यात सरासरी सुमारे 20 टक्के पावसाची कमतरता असून गेल्या काही काळात धान व सोयाबीन पिकांच्या पेरण्या उत्तम पावसामुळे रखडल्या आहेत. अशातच जिल्ह्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसाने एकीकडे शहरवासीयांची त्रेधा उडविली असली तरी शेत पिकांसाठी हा पाऊस उत्तम समजला जात आहे. जिल्ह्यातील विविध लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पात पाणीसाठा जेमतेमच होता. ऐन पावसाळ्यात ही स्थिती चिंताजनक असताना परिस्थितीत पाऊस बरसत असल्याने समाधान व्यक्त केलें जात आहे.