Devendra Fadnavis Will Be The Next CM of Maharashtra: भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेतापदी नियुक्ती झाली आहे. विधीमंडळातील सर्वात मोठ्या पक्षाचा गटनेता हाच बहुमत असल्यास मुख्यमंत्री होतो. त्यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे. भाजपाच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. फडणवीसांची गटनेतापदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीसच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून उद्या म्हणजेच गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यात तेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसणार आहेत. (दिवसभरातील राजकीय घडामोडींचे सर्व LIVE UPDATES जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
सकाळी साडेदहाच्या सुमारास विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली. कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीसही उपस्थित होते. जवळपास अर्धा तास ही बैठक सुरु होती. गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर हा प्रस्ताव विधिमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांनी कोअर कमिटीच्या बैठकीतील फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ सदस्य म्हणजेच नवनिर्वाचित आमदारांसमोर मांडला. या प्रस्तावाला आशिष शेलार, पंकजा मुंडेंसहीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन देत फडणवीसांचं अभिनंदन केलं. केंद्रीय निरिक्षक म्हणून आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अन्य कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं घोषित करत फडणवीसांच्या नावाची गटनेता म्हणून निवड झाल्याची घोषणा केली.
विधीमंडळ पक्षाचा नेता भाजपकडून घोषीत झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. भाजपच्या नेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीचे 3 प्रमुख नेते म्हणजेच एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्रच राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. 2 वाजता अजित पवार दिल्लीहून मुंबईत पोहोचतील अशी माहिती समोर येत आहे. दुपारी साडेतीन वाजता हे तिन्ही नेते राज्यपालांची भेट घेणार आहे. साडेतीन वाजताची वेळ ही राज्यपालांच्या भेटीसाठी नियोजित केली आहे.
नक्की वाचा >> 'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री...', मोदींचा उल्लेख असलेलं पत्र Viral
उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेसमोरील आझाद मैदानामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. आझाद मैदान परिसरामध्ये 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.