MLA Rohir Pawar on Eknath shinde : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्या अडवत त्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी याचा निषेध नोंदवला होता. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई जाणार होते मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वातावरण चिघळेल तुम्ही काही येऊ नका, असं म्हटलं होतं. त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी दौरा रद्द केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. हिंदुत्त्वासाठी आम्ही बाहेर पडल्याचं शिंदेंनी अनेकवेळा सांगितलं आहे. शिंदेंनी एका रात्रीत आमदांराना घेऊन सूरत गाठली होती. त्यानंतर गुवाहाटीला त्यांनी मुक्काम हलवला होता. याचाच धागा पकडत रोहित पवारांनी कर्नाटकच्या प्रश्नावरून शिंदेंना सुनावलं आहे.
वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी #कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 7, 2022
वैयक्तिक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही, पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत पवार यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू, करू, केंद्राशी बोलू ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांसह आदित्य ठाकरे यांनीही सीमावादाच्या प्रश्नावरून शिंदेंवर टीका करताना त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या महाराष्ट्रातील गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री यावर गप्प का?, स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.