Movie on Manoj Jarange : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एका घटनेनं ढवळून निघालं आहे. ही घटना म्हणजे जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं आंदोलनं. गेल्या 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आणि त्यांचं हे आंदोलन दाखवण्यात येणार आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या आयुष्यावर येणाऱ्या चित्रपटाविषयी विचारता त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर देत म्हणाले की 'हा नवीनच ताप आलाय तो एक. इथंपर्यंत आलाय आता. पहिलेच उत्तर देऊन ..देऊन मी बेजार झालोय. ते लोक अचानक आले. मला वाटलं आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले असतील. त्यांनी सिनेमाबद्दल बोलणं सुरू केलं. पण ही त्यांची भावना आहे. त्यावर मी काय बोलणार. आमच्याकडून, मराठा समाजाच्यावतीनं त्यांना शुभेच्छा...असं जरांगे म्हणाले.'
पुढे चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळण्यावर मनोज जरांगे म्हणाले की, 'त्या लोकांनी मला चित्रपटात काम करणार का असं विचारलं होतं. तर मी त्यांना सांगितलं की मला हे कसं करता येईल... ते तुमचं तुम्ही करा... आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.'
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे हे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र, मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.
हेही वाचा : ...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून
मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली.