मुंबई : 'मच गया शोर' म्हणत सारे गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. चौकाचौकात दहीहंडीचा सराव करणारी पथके दिसू लागली आहेत पण ऐनवेळी बहुतांश आयोजकांनी यातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोविंदा थरावर थर रचण्याची तयारी करत असले तरी यंदा आयोजक याबाबतीत उत्साही नसल्याने उत्सवावर याचा परिणाम झालेला दिसेल.
थर रचण्यावर असलेले निर्बंध उच्च न्यायालयाने शिथिल केल्यानंतर 'गोविंदां'मध्ये आनंदाचे वातावरण होते. दहीहंडीला गेल्या काही वर्षात इव्हेंटचे स्वरुप आल्याने अनेक राजकीय पुढारी, बिल्डर्स, व्यावसायिक यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. 'जेवढे जास्त थर तेवढी जास्त रक्कम' अशा समीकरणामुळे गेल्या काही वर्षात जास्त रक्कमेची 'मानाची हंडी' असेही स्वरुप येताना दिसत असते. वयाची मर्यादा, थरांची मर्यादा, सुरक्षेचे उपाय यामुळे काही वर्ष हळूहळू आयोजन कमी होतच होतं. यासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. आयोजकांवर जाचक नियम लादण्यात आल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर असल्याचेही बोलले जात आहे.
दहीहंडीच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाचे निर्बंध, गेल्या वर्षी झालेली नोटबंदी आणि आता आलेला जीएसटी कर यामुळे ही यामागची प्रमुख कारणे असल्याची चर्चा आहे. प्रायोजकांच्या कमतरतेमुळे आयोजकांनीही पाय मागे घेतला आहे. 'आयबीएन लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार यंदा मुंबईतील दहीहंडी आयोजन ६०-७० टक्क्यानं कमी झाले आहे तर मुंबई उपनगरातल्या एकट्या गोरेगाव परिसरातील २२-२५ आयोजकांनी माघार घेतलीय.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी आयोजकांनी माघार घेतली असली तरी ठाणेकर आयोजकांच्या शिवाय कोर्टाचे निर्बंध उठल्यामुळे जास्तीत जास्त थर लावण्याची चुरस सुद्धा सुरु होणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ठाण्याचा दहीहंडी उत्सव हा दणक्यातच होणार आहे. मुंबईतली सगळी मोठी दहीहंडी पथके त्यामुळे ठाण्यालाच जास्त पसंती देणार आहेत.