काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे. 

आकाश नेटके | Updated: Oct 7, 2023, 12:16 PM IST
काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 101 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 25 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. आजच्या महत्त्वाच्या दिवशीच नागपूरकर (Nagpur) ओजस देवतळेनेही (Ojas Devtale) आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड इव्हेंटमध्ये( वैयक्तिक) गोल्ड मेडल मिळवले आहे. याअगोदर ओजसने मेन्स टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाउंड मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

तिरंदाजीत कंपाउंड इव्हेंटच्या फायनलमध्ये ओजस देवतळेने भारताच्या अभिषेक वर्मा विरुद्ध सरशी साधली आहे. तिसचे सुवर्णपदक जिंकत असताना नागपुरात ओजसच्या घरी त्याचे कुटुंबीय आणि तिरंदाज मित्रमंडळी एकत्र त्याचा इव्हेंट पाहिला. त्याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि ढोल ताशावर नाचत आपला आनंद साजरा केला आहे.

दरम्यान, याआधीआशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड मिश्र सांघिक तिरंदाजी इव्हेंटमध्ये मराठमोळ्या ओजस देवतळे व ज्योती वेण्णम यांनी सुवर्णवेध घेतला होता. देशाकरता सुवर्णपदकाची कमाई करताना ओजसने आशियाई क्रीडा स्पर्धेत मेडल मिळवणारा पहिला नागपूरकर होण्याचाही मान मिळवला आहे. झपाटल्यागत 12 तासांची मेहनत आणि सोशल मीडियापासून अलिप्त राहत आणि प्रचंड कष्ट आणि मेहनत घेत ओजसने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याची ही किमया साधली आहे.

ओजसने मिळवलेल्या या यशानंतर त्याचे आई-वडीलही भावनिक झाले होते. नागपुरात तिरंदाजीच्या फारशा सुविधा उपलब्ध नसताना ओजसने सातारा येथे जाऊन सराव केला. पाऊस ,ऊन असला तरी त्याच्या सरावात कधीच खंड पडला नाही. ओजसला लहानपणापासून तिरंदाजीमध्ये आवड होती. त्याने शालेय, राज्य आणि देशपातळीवर आपलं कौशल्य दाखवत अनेक पदकं मिळवली आहेत. बालपणी नेम मारण्यासाठी खेळण्यातल्या धनुष्य हाती आल्यानंतर खराट्याच्या काड्यांचा ओजसने वापर केला होता आणि इथूनच त्याच्या तिरंदाजीचा प्रवास सुरु झाला होता.

पंतप्रधानांकडून कौतुक

ओजस देवतळेने कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दृढ संकल्प आणि एकाग्रता यामुळे ओजसने चाांगली कामगिरी केली आहे. त्याने सूवर्ण पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओजसच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचंही अभिनंदन केलं होतं.