'पैसे कमावणे हाच शिवसेनेचा धंदा', 'नाणार'वरुन नारायण राणेंचं टीकास्त्र

नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. 

Updated: Aug 8, 2020, 09:56 PM IST
'पैसे कमावणे हाच शिवसेनेचा धंदा', 'नाणार'वरुन नारायण राणेंचं टीकास्त्र title=

सिंधुदुर्ग : नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नाणारला ८० टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचं सांगतिलं जात आहे. त्यावर नारायण राणेंनी टीका केली आहे. 

'पैसे कमावणं हा शिवसेनेचा धंदा असल्यामुळे ते काल काय बोलेले आणि आज बोलण्यामध्ये काय बदल करतील सांगू शकत नाही. त्यामुळे नाणारला पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. ८० टक्के म्हणजे १०० टक्केच समर्थन झालं. ८० टक्के समर्थन होत नाही. शिवसेनेचं हे घुमजाव आहे,' असं नारायण राणे म्हणाले. 

नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं स्पष्टीकरणही नारायण राणे यांनी दिलं आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असताना शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. या विरोधानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला होता. 

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही नाणारचा मुद्दा पुढे आला होता. नाणारमधल्या स्थानिक शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची शिवसेनेतून उचलबांगडी करण्यात आली होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही नाणारची जाहीरात प्रसिद्ध झाली होती, त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. अखेर नाणारबाबत आपली भूमिका स्पष्ट असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.