सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोमवारी सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून पवार कराडला पोहोचले. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. सध्याच्या घडीला सरकार स्थापनेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने या मुद्द्यावर आपण फार बोलणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. शिवाय उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा अजित पवार यांचा निर्णय व्यक्तिगत असल्याचं सांगत याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही आणि मुळात हे पक्षाचं धोरणंही नाही ही बाब त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
एक पक्ष म्हणून आम्ही या सत्तेत सहभागी नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगत राज्यपालांनी सांगितलेल्याच दिवशी आता सारंकाही सिद्ध होणार असल्याचं सूचक विधान केलं. भाजपला समर्थनाचं एनसीपीचं धोरण नाही असं म्हणत केंद्राच्या सत्तेचा गैरवापर, राज्यपाल पदाचा गैरवापर करत हेवतसे निर्णय घेणं घटनेच्या चौकटीत बसत नसल्याचं सांगत त्यांनी भाजपवर वार केला.
अजित पवारांच्या निर्णयाविषयी आपल्याला माहिती नसल्याचं म्हणत आतापर्यंतच्या पक्षाच्या बैठकीत, कार्यकारिणीच्या बैठकीतही अजित पवार उपस्थित होते. पण, त्यांचं धोरण बदलणं हा व्यक्तिगत निर्णय असल्याचं ते म्हणाले. मुळात या परिस्थितीमध्ये एका व्यक्तिपेक्षा पक्षाच्या निर्णयाला महत्त्वं असतं असा सूर पवार यांनी आळवला. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना पवारांना या कृत्याबद्दल पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईला सामोरं जावं लागणा का, असा प्रश्न केला असता याविषयीचा निर्णय पक्ष घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सत्तेचा पेच आणि आव्हानं पाहता ही संकटं तात्पुरती असल्याचं म्हणत तरुण पिढी, सामान्य जनतेचा पाठिंबा यांमुळे मला कसलीच चिंता वाटत नसल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
चर्चा लांबल्यामुळे अजित पवारांनी निर्णय घेतला यावर शरद पवार म्हणाले....
'पाच वर्षे राज्य चालवायचं ही मोठी बाब आहे. त्यासाठी दोन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येण्याचा विचार करतात तेव्हा किमाम मान्यता कार्यक्रमांचं सरकार चालवणं फायद्याचं असतं', असं म्हणत वाजपेयी, बॅनर्जी अशा सरकारची उदाहरणं त्यांनी दिली.
शिवसेनेच्या काही भूमिका होत्या, आमच्या वेगळ्या भूमिका होत्या, मतं होती पण हे सारं बाजूला ठेवत राज्याच्या दृष्टीने विचार केला गेला आणि त्यासाठीच या चर्चा होत होत्या, या शब्दांत त्यांनी स्पष्टीकरण गिलं. कर्जमाफीची घोषणा बोण्यापूरती ठीक आहे, पण कोणतं कर्ज, किती जणांचं कर्ज, रक्कम किती, राज्याच्या खजिन्यात तरतूद आहे का हे निकषही विचारात आणणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय हा विचारपूर्वकपणे घेण्यात आला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.