तुळजापूर : जगभरात सध्या कोरना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अद्याप राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसला तरी राज्यातील शिर्डीच्या साई मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनाने कोरोनाबाबत वेळीच दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे तुळजा भवानी मंदिर प्रशासन मात्र कोरोनाबाबत गंभर नसल्याचं आढळून आलं आहे. मंदिर फक्त दोन तासांनी स्वच्छ करण्याचे आदेश देऊन प्रशासन निवांत झालं आहे.
मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या जनजागृतीबाबत कोणत्याही प्रकारची पावलं उचललेली दिसून येत नाहीत. तुळजाभवानी देवीला केवळ राज्यातूनच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यासह इतर राज्यातून देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर मध्ये येत असतात. त्यामुळे या बाबत लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे.
तर, मंदिर परिसर दर दोन तासांनी स्वच्छ करुन घेण्यात यावा, काय काळजी घेण्यात यावी याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या बोर्डाच्या छपाईचं काम दिलं असल्याचं, तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापकांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात मेळावे, यात्रा, कार्यक्रम घेण्यापासून लोकांना परावृत्त करण्याच्या राज्य सरकारने सूचना केल्या आहेत. कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना ११ ते १३ मार्च दरम्यान ट्रेनिंग दिलं जाणार आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. मास्कची गरज नाही. त्यामुळे मास्कची साठवणूक करू नका असं टोपे यांनी म्हटलंय. कोरोना व्हायरस बाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहे, शाळा बंद करा, काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रोक पद्धती बंद करण्यात आली आहे, हे चुकीचं आहे असं ते म्हणाले.