Pune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य

Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे

आकाश नेटके | Updated: May 15, 2023, 07:16 PM IST
Pune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य title=

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे :  गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच स्पर्धा परीक्षांचा (MPSC) अभ्यास करणाऱ्या एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. वसतीगृहात राहणाऱ्या या तरुणाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या सर्व प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. विजय नांगरे (21) असे या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी विजयने एक चिठ्ठी देखील लिहील्याचे समोर आले आहे. विजयच्या आत्महत्येनंतर वसतीगृहात खळबळ उडली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विजयचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मूळचा परभणीचा असलेला विजय तुकाराम नांगरे हा पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. यासोबत तो एमपीएससी स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करत होता. विश्रांतवाडीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातच विजय नांगरे राहत होता. सोमवारी सकाळीच अभ्यासिकेच्या पाचव्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

विजयच्या मित्रांना हा प्रकार समजताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ विश्रांतवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावून घेतला असावा. 

दरम्यान, यावेळी पोलिसांना विजयच्या खोलीत एक चिठ्ठी देखील सापडली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितलं आहे. 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मी काही करू शकलो नाही,' असं विजयने या चिठ्ठीत लिहीले होते. दुसरीकडे या आधीही त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विजय थांबला नाही. त्याने पुन्हा दोन वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी सोमवारी गळफास घेऊन विजयने आपली जीवन यात्रा संपवली.

तीन हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या

पुण्यातील वाघोलीत एका इंजिनिअर तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. केवळ तीन हजार रुपयांसाठी या तरुणाची दोघांनी मिळून गळा चिरून हत्या केली होती. गेल्या आठवड्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.