Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. तर, पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान बुधवार चौकात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकात वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे वाहनातील एकाने संबंधित महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले.
महिला अधिकाऱ्याला पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सुदैवाने त्याच्या हातातील लाईटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत चक्क पोलिस अधिकाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यानची ही घटना आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार चौकात ही घटना घडली आहे. वाहतूक नियमन करत असताना एक महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांनी एका संशयित वाहनाला रोखले. त्यावरुन वाहन चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना कारमधून एक व्यक्ती उतरला आणि त्याने महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले.
पेट्रोल टाकल्यानंतर त्याने त्यांना पेटवून देण्याच्या उद्देशाने लायटर काढले. मात्र ते लायटर पेटू न शकले नाही. त्या व्यक्तीने लायटर उलटे पकडले होते. त्यामुळं या दोघांचाही जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.