विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुण्यात मोठे फेरबदल

 पुण्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बायपास सर्जरीला सुरूवात केली आहे.

Updated: Jun 25, 2019, 07:38 PM IST
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुण्यात मोठे फेरबदल title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बायपास सर्जरीला सुरूवात केली आहे. पुण्यातलं शिवसेनेचं शहरप्रमुखपद रद्द केलं आहे. महापालिकेतला गटनेताही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिवसेनेतील अनपेक्षित फेरबदलांवरून सध्या पुण्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात दोन शहर प्रमुख होते. माजी आमदार महादेव बाबर यांच्यावर पूर्व भागाची तर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यावर उर्वरित पुण्याची जबाबदारी होती. त्यांच्या पदांना स्थगिती देऊन शहरात विधानसभानिहाय प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं यापुढे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आठ वेगवेगळे प्रमुख असतील.

शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेतेपदी पृथ्वीराज सुतार यांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान गटनेते संजय भोसले यांना वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सेनेचा एकही आमदार पुण्यातून निवडून आला नव्हता. महापालिकेतही पक्षाला १० जागा मिळाल्या. अशा परिस्थितीत पक्षाला नवसंजीवनी द्यायची असेल तर काही बदल हे अपरिहार्य होते.