मुंबई : कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. चीपी विमानतळ १ मेपासून सुरू होणार आहे. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोकणातही व्हायरॉलॉजी लॅब सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. कोकणचे काय करायचे, असा प्रश्न विचारला जात होता. मी सांगू इच्छीतो 'सिंधु-रत्न समृद्धी योजना' आणण्यात आली आहे. कोकणचे कॅलिफोनिर्या नव्हे तर कॅलिफोर्नियाचे कोकण करु, असा विकास व्हायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानसभा २९३ अन्वये कोकण विषयक प्रस्तावावर उत्तर दिले. (भाग- १) pic.twitter.com/ND6P0zd3Yb
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 5, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील चिपीचे विमानतळ १ मेपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. तसेच कोकणात पुण्यासारखीच व्हायरॉलॉजी लॅब उभी करण्यात येणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. कोकणच्या कॅलिफोर्निया करायच्या घोषणा केल्या होत्या. मात्र अजूनही काही झाले नसल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. मासेमारी, काजू प्रक्रिया उद्योग यावर अभ्यास करुन त्यांच्यासाठी काय करता येईल, याच्यावर विचार सुरु आहे. मच्छीमार यांना चांगली सुरक्षा मिळण्यासाठी चांगला कायदा आणण्याची गरज आहे. मच्छीमार यांच्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यात येत आहे. रस्ता काम, समुद्री रस्ते कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. कोकणातील जलसिंचन योजना बंद केलेली नाही. नळाद्वारे प्रत्येकाला घरात पाणी देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानसभा २९३ अन्वये कोकण विषयक प्रस्तावावर उत्तर दिले. (भाग- २) pic.twitter.com/d1sMyFa5sx
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 5, 2020
कोकणात पाणबुडी योजना पहिल्यांदा आणली पाहिजे. जलदुर्ग सफर करण्याबाबत विचार सुरु आहे. किल्ल्यांची माहिती देण्यासाठी किल्ला सफर करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले आहेत. कोकणात आंबा फळ प्रक्रिया उद्योग सुरु होण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. आजपर्यंत केवळ घोषणा करण्यात आल्या. मात्र, काहीही झालेले नाही. पर्यटन व्यवसाय वाढीला लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यातून नवीन रोजगार उपलब्ध होईल. पर्यटन व्यवसायातून विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती विधानसभेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळवड न खेळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलंय. कोरोनाला घाबरू नका मात्र व्यक्तिगत पातळीवर खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुंबई, पुणे, नागपूर इथे चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून मास्कचाही पुरेसा साठा केल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.