अजित पवारांचे निर्देश, कोरोना रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत....

कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा

Updated: Jul 17, 2020, 05:16 PM IST
अजित पवारांचे निर्देश, कोरोना रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत.... title=
संग्रहित छायाचित्र

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यामुळं आता पुण्यातील अ़डचणी आणखी वाढताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर आता खुद्द उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई पॅटर्नचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. 

पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे सर्व नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होते.

पुण्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे असा सूर पवार यांनी आळवला.  त्यासाठीच्या सर्व आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, यासाठीही ते आग्रही दिसले. 

 

पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील, पण....

 

मुंबईच्या धर्तीवर पुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल. कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामिण क्षेत्र  मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत 'कोरोना'ची गंभीर लक्षणे असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले.