अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. आत्तापर्यंत स्वाइन फ्लूने नागपुरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहरातले 3 ,ग्रामीणमध्ये 1 आणि जिल्ह्याबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये यावर्षी आजपर्यंत स्वाइन फ्लूचे तब्बल 75 रुग्ण नोंदवले गेले आहे. यातील सर्वाधिक 45 रुग्ण हे नागपुरातील शहरी भागातील आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहे.
कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे सुद्धा रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिबंधासाठी शहरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला 5000 इन्फल्युएंझा लसमात्रा प्राप्त झालेल्या आहेत.
ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. नागपूर शहरामध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय शहरात स्वाईन फ्लू बाधित चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूपासून संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात येत आहे.
सुरूवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहितील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फल्युएंझा लस दिली जाईल.
इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक आणि मोफत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते
लसीकरणामुळे काही जणांना ताप येणे, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना अथवा इतर प्रकारचा त्रास होउ शकतो. त्यामुळे अशा प्रतिक्रिया उद्भवल्यास लसीकरण घेतलेल्या लाभार्थ्यांनी घाबरून जाउ नये, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात येत आहे
स्वाईन फ्लू टाळण्याकरीता हे करा
- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत
- गर्दीमध्ये जाणे टाळा
- स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान 6 फूट दूर रहा
-खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
- भरपूर पाणी प्यावे, पुरेशी घ्यावी
-पौष्टीक आहार घ्यावा.