मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.  

Updated: May 12, 2024, 12:33 PM IST
मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...  title=
Teacher along with Principal arrested for taking bribe ACB in nashik

Nashik News Today: शिक्षकांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या सातपूर येथील श्रमिकनगर परिसरातील शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. सातवीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या मोबदल्यात पालकांकडूनच मुख्यध्यापक आणि उपशिक्षकांनी लाच घेतली. मात्र, या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

श्रमिकनगर परिसरातील शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात हिंदी भाषिक मुलांना इयत्ता सातवीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या मोबदल्यात पालकांकडून १० हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (५६) व उपशिक्षक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (५७) यांना शनिवारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.     

मूळ बिहार राज्यातील तक्रारदार यांची दोन्ही मुले मनपा शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत; शाळेत भाषेची अडचण भेडसावत होती. तक्रारदार यांना त्यांच्या मुलांना गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात प्रवेश हवा होता. यासाठी तक्रारदार यांनी मिश्रा व पांडे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत विनंती केली. मुलांना प्रवेश देण्याबाबत १६ हजार रुपयांची लाच इमारत निधीच्या नावाखाली मागितली. तक्रारदार यांनी पावती मिळेल का, अशी विचारणा केली असता पावती मिळणार नाही, असे सांगितले. 

तक्रारदारांने यासंदर्भात लाचलुचपच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाने पडताळणी केली. त्यानुसार, तक्रारदार पुन्हा गुप्ता हिंदी माध्यमिक शाळेत मुलांच्या प्रवेशासंदर्भात भेटले. त्यावेळी लाचखोर मुख्यध्यापक व शिक्षकाने पंचासमक्ष इमारत निधीच्या  नावाखाली 10 हजार रुपयांचा स्वीकारला. त्यावेळी उपअधीक्षक विश्वजित जाधव, हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार, सचिन गोसावी, दीपक पवार, आदींनी पांडे यांना शनिवारी लाचेचा १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मिश्रा व गुप्ता यांच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.