उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कोकण (Konkan) दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2024, 03:34 PM IST
उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कोकण (Konkan) दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. सूर्यकांत दळवी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी भाजपात प्रवेश कऱणार असल्याची चर्चा रंगली होती. आज अखेर पक्षप्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे ते पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होतं. कोणताही निर्णय घेताना सूर्यकांत दळवी यांना विश्वासात घेतलं जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. 

मधल्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कऱणार असल्याचीही चर्चा होती. सुनील तटकरे यांची त्यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांनी जोर धरला होता. पण अखेर सूर्यकांत दळवी यांनी मुंबईतील कार्यक्रमात भाजपात प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सूर्यकांत दळवी हे शिवसेनेमध्ये 1986 सालापासून कार्यरत आहेत. यादरम्यान ते पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आले होते. डबल हॅट्रिक मारण्याच्या तयारीत असतानाच थोडक्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पक्षातील त्यांचं महत्व कमी होऊ लागल्याचं बोललं जात होतं. या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. 

2014  विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडलं असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला होता. तसंच 2019 च्या निवडणुकीत रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले होते. ठाकरेंना रामराम करण्यामागे याच गोष्टी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. 

रामदास कदम यांच्यावर त्यांनी जाहीरपणे बुवाबाजीचा आरोप केला होता. रामदास कदम हे जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला होता. 

बाळासाहेबांच्या एका आदेशावर सोडली होती मुंबईतील नोकरी

सूर्यकांत दळवी यांना बाळासाहेबांचा विश्वासू कडवट शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं. 1990 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईतील नोकरी सोडून ते दापोलीत पोहोचले होते. भारत पेट्रोलियम कंपनीत ते कामाला होते. यानंतर त्यांनी रत्नागिरीत शिवसेना वाढवण्यास मदत केली. 1990 मध्ये पहिल्याच प्रयत्नात दणदणीत विजय मिळवत ते आमदार झाले होते. 1990 पासून सलग 25 वर्षं त्यांनी आमदारकी भूषवली. शिवसेना सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी होती. पण त्यांनी बाळासाहेबांना मला मंत्रीपद नको, त्याऐवजी महत्वाकांक्षी लोकांना द्या असं सांगितलं होतं. 2014 मध्ये त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More