Ajit Pawar : तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा राहिलेली नाही. बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्या सामना टाळण्यासाठी अजित पवारांनी जय पवारांचं नाव पुढं केल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा जेव्हा जय पवारांचं नाव पुढं केलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही त्यांच्या या प्रस्तावाला विरोध केला होता. एवढंच नव्हे तर बारामतीतून एक लाख सह्याही गोळा केल्या होत्या. बारामतीतून अजित पवारच उमेदवार असतील असं पक्षातून सांगण्यात आलं असतानाही अजित पवारांनी पुन्हा बारामतीतून मी जो उमेदवार देईन तो निवडून द्या असं भावनिक आवाहन केलंय.
बारामतीवर अजित पवारांची राजकीय पकड राहिली नसल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. अजित पवार हे बारामतीच्या संभाव्य राजकीय संघर्षातून पळवाट शोधल्याचा आरोप होऊ लागलाय. अजित पवारांच्या माघारीच्या वक्तव्यावर शरद पवारांनी त्यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. अजित पवार लोकसभेचीच पुनरावृत्ती करणार का असा टोला शरद पवारांनी लगावलाय.
बारामतीची लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भावनिक करुन लढवली होती. विधानसभा निवडणूक भावनिक करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असल्याची शंका येऊ लागलीय. येत्या काळात अजित पवारांच्या उमेदवारीसाठी बारामतीत त्यांच्याच पक्षाकडून आंदोलनं झाली तर नवल वाटू नये... रोखठोक अजित पवारांची भावनिक चाल कितपत यशस्वी होते का हे पाहावं लागणार आहे.