कोरोनामुळे राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका

राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येईल. 

Updated: Mar 26, 2020, 10:41 PM IST
कोरोनामुळे राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने राज्य सरकारने तुरुंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने पॅरोलवर सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश दिले. 

राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे

देशमुख यांनी म्हटले की, सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येईल. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता काहीजणांनी बोलून दाखवली आहे. 

शरद पवार मोदी सरकारच्या मदतीला; खासदार-आमदारांना दिला 'हा' आदेश

परंतु, कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भावाचा वेग पाहता तुरुंगातील कैद्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हे पाऊल उचलल्याचे समजते. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १३० रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात राज्यात आठ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.