गणेश पुजनाने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरूवात

 सकाळपासूनच शिवाजीपार्क येथील वातावरण भगवामय झालेले दिसून येत आहे. 

Updated: Jan 23, 2019, 12:59 PM IST
गणेश पुजनाने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरूवात  title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येत शिवसैनिक शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, भाजपाशी युतीच्या चर्चेचा निर्णय झाला नसताना मुंबईत शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते आणि हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उपस्थित आहेत. सकाळपासूनच शिवाजीपार्क येथील वातावरण भगवामय झालेले दिसून येत आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज गणेशपूजन झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे कुटुंब स्मारकस्थळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. 'एमएमआरडीए'कडे याची संपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय हा निर्णय झाला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेला खूश करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप कागदोपत्रीच दिसत असल्याने शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला होता.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आजा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देतील. अशावेळी शिवसेनेचे नेते काय भूमिका मांडतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेश पुजनाने बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.