कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर 'व्हिडिओ बॉम्ब' टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Updated: Mar 9, 2022, 03:04 PM IST
कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा title=

मुबंई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर व्हिडिओ बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  पेनड्राईव्ह (Pen Drive) विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. 

सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

हा तर पहिला बॉम्ब होता
आमच्याविरोधात षडयंत्र करताय, काल तुमचं षडयंत्र उघड केलंय, पण आम्ही घाबरणारे नाही, आम्ही मोदींचे सैनिक आहोत. एका नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला आहात, पण मोदींजींना संपवू शकला नाहीत, कारण करोडो लोकांचे आशिर्वाद आहेत. 
 
कालचा बॉम्ब तर पहिली बॉम्ब आहे, असे अनेक बॉम्ब ठेवले आहेत, ज्या ज्यावेळी आवश्यक आहेत त्यावेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. 

देशद्रोह्यांविरोधात संघर्ष
मुंबई करता, महाराष्ट्र करता, संपूर्ण देशाकरता, संघर्ष करण्याकरता आझाद मैदानावर उपस्थित आहात. हा साधा संघर्ष नाहीए, हा  देशभक्तांचा संघर्ष आहे, देशद्रोह्यांविरोधात हा संघर्ष आहे, पाकिस्तानधार्जिण्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. दाऊदच्या साथीदारांविरोधात हा संघर्ष आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला तर नवाब मलिकांचा राजीनामा का नाही. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? हा आमचा सवाल आहे. कोणाच्या दाड्या कुरवाळताय म्हणून तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. हे आम्हाला समजलं पाहिजे, 

पण तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देशद्रोह्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.