'विरोधी पक्षाने अडथळे आणण्याऐवजी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे'

सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये. 

Updated: Jun 27, 2020, 01:05 PM IST
'विरोधी पक्षाने अडथळे आणण्याऐवजी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे' title=

मुंबई: सध्याच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समस्यांची अचूक जाण असलेले अनेक मंत्री आहेत. एव्हाना या मंत्र्यांनी आपापल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली असती. मात्र, सध्या सरकारची सर्व ताकद आणि कौशल्य कोरोनाचा सामना करण्यातच खर्ची पडत असल्याची खंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते शनिवारी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे   #e_conclave मध्ये बोलत होते. 

यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे कान टोचले. सध्याच्या संकटकाळात सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीकडील राज्यकर्त्यांना आपापल्या जबाबदारीचे भान राखले पाहिजे. महाराष्ट्रात मात्र विरोधी पक्ष सातत्याने सरकारच्या कामांत अडथळे आणत आहे. त्याऐवजी विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. यामुळे किमान राज्यातील कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होण्यात मदत होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये. प्रत्येक सरकारमध्ये मग ते एकपक्षीय असले तरी त्यांच्यात कुरबुरी असतातच. त्यामुळे विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी संजय राऊत यांनी कोरोनानंतर राज्यासमोर कोणतीही आव्हाने असतील, यावरही भाष्य केले. कोरोनानंतर महाराष्ट्रासमोर कोणते प्रमुख संकट असेल तर ते म्हणजे कष्टकऱ्यांचा जीव वाचवणे असेल. लॉकडाऊमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत सगळ्या क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तरुणवर्ग मोठ्या संख्येने घरी बसून आहे. हा एकप्रकारचा मानवी बॉम्ब आहे. त्यामुळे आगामी काळात लोकांमध्ये रोष निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

'नोकरशाहीची भुताटकी मानगुटीवरुन कशी फेकून द्यायची, हे उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे'
सध्या राज्यातील नोकरशाहीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. राज्य नक्की कोण चालवत आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, नोकरशाही हे सरकारचं महत्त्वाचं अंग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एकदा बाळासाहेब ठाकरे यांना मी नोकरशाहीच्या जाचाविषयी विचारणा केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, माझ्या सरकारमध्ये नोकरशाही आणि लालफितशाही दिसली तर मी मंत्रालय गदागदा हलवेन. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पूत्र आहेत. त्यामुळे कोणाला किती मानगुटीवर बसवायचे किंवा भुताटकी कशी फेकून द्यायची, हे उद्धव ठाकरेंना माहिती असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.