कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सुरक्षारक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मरोळ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा'
मात्र, या सगळ्यामुळे तेजस ठाकरे यांना फारसा धोका नाही. कारण, तेजस ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा सुरक्षारक्षकांशी थेट संपर्क आला नव्हता. यापूर्वी मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडणे शक्यतो टाळत आहेत. मात्र, याच कारणामुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.
मोठा दिलासा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येणार, देशातील परिस्थितीही बदलणार
तत्पूर्वी आज सकाळीच ठाकरे सरकारमधील चौथ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती.
दरम्यान, काल मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांची संख्या ५ हजार ७११ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून सरासरी ५५ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन १.२६ टक्के झाला आहे.