Aditya Thackeray on Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल झाले. सायन, कुर्ला चेंबूरच्या टिळकनगर मध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले होतं.रात्री 1 वाजेपर्यंत पाणी भरलेलं होत. तर कुर्ला स्टेशन वर बेस्ट बस किंवा रिक्षा नसल्याने चाकरमनी पायी जात असल्याचे दृश्य दिसत होते. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहने रस्त्यात बंद पडत होती. यावरुन आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) हल्लाबोल केला आहे.
'इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं'
मुसळधार पावसामुळं मुंबई ठप्प झाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी टोळ्यांनी सगळी कंत्राटं वाटून घेतली आहेत असा आरोप केला. मेट्रोची गर्दी, रेल्वेची गर्दी, वाहतूक कोंडी, मुंबईचं इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं. आज मुंबई, ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आजुबाजूला जे गराडा घेऊन फिरतात तेच पोलीस बंदोबस्ताला लावले असते तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. या सरकारचं प्राधान्य खोके आणि पैशांना आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.
काही मिनिटांच्या पावसात मुंबई ठाणे पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. मुंबई ठप्प झाली. पहिल्यांदाच वेस्टर्न हायवे तुंबले, बीएमसीची यंत्रणा काल कुठे होती. दोन पालकमंत्री काल कुठे होते. अर्धा किमीचे रस्तेही काँक्रीटचे झाले नाहीत .मुख्यमंत्री यांनी काल म्हटलं की कुठे भरलंय का पाणी यंदा आणि दोन तासांत मुंबई तुंबली असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. बीएमसीत 15 वॉर्ड ऑफिसर नाहीयत. एवढी भयानक राजवट पाहिली नाही. काल रस्त्यावर अधिकारी दिसले नाहीत. पंप चालू नव्हते. पंपिंग स्टेशन अगोदरच सुरू केले नाहीत, 2005 नंतर वेस्टर्न हायवे तुंबला असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.
हेच त्यांचे राजकारण आहे. मुंबई लुटली, महाराष्ट्र लुटला, पक्ष फोडायचे त्यांचं काम. पण अर्धा तासांत शहरे बुडली, त्यावर नाही बोलणार असा टोला आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांना लगावला
चौकशी समिती स्थापन
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अंधेरी (पूर्व) मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसंच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ 3 चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत. सीप्झ मध्ये पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला, त्या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.