शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द

 उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. 

Updated: Oct 30, 2019, 01:49 PM IST
शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द title=

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता  बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे. उद्याच्या या बैठकीत भाजपसाेबत सत्तेत जाण्यासंदर्भात तसेच विधिमंडळ नेता निवडीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी आज शिवसेना नेत्यांची माताेश्रीवर खलबते सुरु झाली आहेत. काल भाजपसाेबतची बैठक रद्द केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा होत आहे. नेते संजय राऊत, अनिल देसाई, शिवाजीराव आढळराव, विजय औटी या बैठकीला उपस्थितीत आहेत. तर आणखी काही शिवसेना नेते माताेश्रीवर येत आहेत. त्यामुळे या बैठकीची माहिती मीडियाला मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.

दरम्यान, भाजपने विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपकडून आज अधिकृत घोषणा केली. निवडणुकीच्यावेळी भाजपने पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील असे जाहीर केले होते. आजच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, युतीत तणाव निर्माण झाल्याने युतीचा मुख्यमंत्री कोण, याचीही चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेनेने ५०-५० सत्तेत वाटा हवा असे सांगत युतीची बोलणी होण्याआधीच भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.