मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर आरोप करणं तर कधी देशातील घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य करणं. यामुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाला आलेल्या एका अडचणीमुळे कोर्टात धाव घ्यावी लागली. मात्र कोर्टात धाव घेऊनही कंगनाच्या हाती काहीच लागलं नाही.
कंगनाला तातडीनं कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. त्यामुळे कंगना अडचणीत सापडली आहे. पासपोर्ट प्राधिकरणानं कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणास नकार दिला आहे. कंगनावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यानं तिच्या पासपोर्ट रिन्यूसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कंगनाला तिच्या धाकड सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट 15 सप्टेंबरपर्यंतच वैध असल्यानं तिला पासपोर्टचं तातडीनं रिन्यू करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कंगनालाच हायकोर्टानं चांगलं फैलावर घेत फटकारलं आहे.
पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? चुकीची याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या चित्रकरणाच्या तारखा बदलता येतात. पासपोर्ट ऑथॉरिटीचा कोणताही लेखी आदेश किंवा प्रतिसाद अर्जात जोडत नाही, असे कसे? आम्ही आदेश कसा करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करत कंगनाला कोर्टानं चांगलंच फटकारलं आहे. कंगनावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट रिन्यू करण्यात अडचणी येत आहेत.