Loksabha 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीत (Mahayuti) काही जागांचा तिढा सुटता सुटत नाहीए. या जागांसाठी चर्चा आणि बैठकाच सुरु आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगलीवरुन (Sangli) तर महायुतीत नाशिकच्या (Nashik) जागेवरुन वाद आहे. महाविकास आघाडीची मंगळवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह मविआचे नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. मविआतील सगळे वाद मिटले असून, मविआत कोणतीही बिघाडी नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. एक दोन जागा होत्या त्याबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या...मात्र, आता सर्व वाद दूर झाले असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटपाची माहिती दिली जाणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय...
सांगलीच्या जागेवरुन मविआत वाद
मात्र, मविआत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागांचा तिढा सुटका का...? या जागा कुणाला मिळाल्या. याबाबतचं चित्र उद्याच स्पष्ट होणाराय. दरम्यान मविआच्या पत्रकार परिषदेनंतर यांच्यात बंडखोरी होईल आणि मविआ तुटल्याची घोषणाही उद्याच होईल असं भाकित शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी वर्तवलंय. दरम्यान, सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील ठामच आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत निर्णय आमच्या बाजूने होईल असा आम्हाला विश्वास असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय. उद्या निर्णयाची गुढी उभारू असं सूचक विधान पाटलांनी केलंय.
महायुतीत नाशिकच्या जागेवरुन वाद
दुसरीकडे, नाशिकच्या जागेवरून महायुतीत गुंता वाढतच चाललाय.. हेमंत गोडसे, भुजबळांऐवजी आता वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपकडून नवा सर्व्हे करत तीन नव्या नावांची संघ परिवाराकडून चाचपणी करण्यात येत असल्याचं समजतंय. राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे, अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत.
साताऱ्यात उमेदवाराविना मेळावे
साताऱ्यात आज महायुतीचे तीन मेळावे होतायत. कराड, वाई आणि शेंद्रे इथे महायुतीचे मेळावे होतायत. मात्र अजूनही साताऱ्यात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. साताऱ्यातून महायुतीकडून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली होती. मात्र अजूनही साताऱ्याची उमेदवारी जाहीर झालेली नाही. मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, साताऱ्यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजेंनी दिलीय. ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते. भाजपच्या दोन याद्यांनंतरही साताऱ्याची जागा जाहीर झालेली नाही. त्यावर प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.