मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.

Updated: Mar 6, 2023, 09:33 PM IST
मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी title=

Maharashtra Politics : कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक (Kasba By Election) जिंकल्यानं महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दहा हत्तींचं बळ आलंय.. निवडणुका एकदिलानं लढलो तर भाजपला (BJP) मात देता येऊ शकते, असा विश्वास मविआच्या नेत्यांना आलाय. याचा प्रत्यय आला तो नांदेडच्या सभेत. एका सभेत गळ्यात भगवं उपरणं घालून आलेल्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. लागलीच त्यांनी या सवालाचं उत्तरही देऊन टाकलं. ही महाविकास आघाडीची सभा आहे.  गळ्या भगवं उपरणं दाखवत त्यांनी ही शिवसेना (Shivsena) असल्याचं सांगतिलं. तर हातात घड्याळ दाखवत राष्ट्रवादी आणि आपण पूर्ण काँग्रेस असल्याचं सांगितलं.

कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. सलग 28 वर्षं भाजपच्या ताब्यात असलेला कसब्यासारखा मतदारसंघ जिंकल्यानं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना दहा हत्तींचं बळ आलंय.   याच जोरावर 2024 च्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार शरद पवारांनीही (Sharad Pawar) बोलून दाखवलाय.

केवळ अशोक चव्हाणच नाही, तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनाही (Ajit Pawar) एकीचं बळ कळलं. तीनही पक्ष एकजुटीने एकत्र आले आणि नीटपणे जागांचं वाटप केलं, तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात एकजुटीनं, एकदिलानं कसं लढता येतं, हे महाविकास आघाडीनं कसब्यात दाखवून दिलं. विजयाच्या रुपानं त्याचं फळही मविआच्या पदरात पडलं. त्यामुळेच मविआचे नेते आता एकसूरात बोलू लागलेत.. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना चिमटाही काढला. अजित पवार शिवसेनेचे कट्टर प्रवक्ते बनले आहेत. त्यांना आता शिवसेनेचं पदच द्यायचं बाकी आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

भगवाधारी अशोक चव्हाण, काँग्रेसशी जुळवून घेणारे अजित पवार, मविआ सरकारचा प्रयोग यशस्वी करणारे उद्धव ठाकरे असे बडे नेते महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. कसब्यातील विजयामुळं मविआचा फेविकॉल जोड आणखी घट्ट झालाय.