Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Maharashtra Politics : गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानभवनाबाहेर अतिशय रंजक असे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे

Updated: Mar 23, 2023, 12:19 PM IST
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Maharashtra Politics : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे - फडणवीस (Shinde - Fadnavis Government) सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे वाभाडे काढताना दिसत आहे. मात्र सभागृहाबाहेर काही वेगळचं चित्र असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय गुरुवारी देखील आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे यांनी भाजपला जबाबदार धरत देवेंद फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर आता विधान भवनात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला आहे. बऱ्याच काळानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे उघडपणे चर्चा करताना दिसून आले. तर हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे.

आम्ही कायमचे शत्रू नाही - गिरीश महाजन

"यामध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. विरोधीपक्ष नेहमी आमच्या समोरच असतो. आम्ही रोज भांडतो पण त्यामुळे हे जुळवाजुळव करुन झालं असे म्हणण्याचे कारण नाही. विधानसभेमध्ये एकमेकांवर टीका करणे सुरुच असते. त्यामुळे आज भेटले म्हणून वेगळं काही आहे असे म्हणण्याचे कारण नाही. 30 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि आता ते वेगळे झाले. त्याला काही ईलाज नाही. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा समोर आल्यानंतर एकमेकांना भेटत असतो. त्यामुळे आम्ही कायमचे शत्रू नाहीत", असे गिरीश महाजन म्हणाले.

हा निव्वळ योगायोग - राष्ट्रवादी कॉंग्रेस

यावर राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनीही भाष्य केले आहे. हा योगायोग आहे. "दोघेही नेते एकाचवेळी तिथे पोहोचले. त्यामुळे ते एकत्र आले. यावेळी आधीही शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे राजकारणात मतभेद असतात पण मनभेद नसतात," असे महेश तपासे म्हणाले.