मुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 30, 2023, 02:37 PM IST
मुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड title=

Mumbai Crime : एटीएममधून पैसे चोरणाऱ्या एका चोरट्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैसे चोरण्यासाठी एटीएममध्ये छेडछाड केल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फेविक्विकचा वापर करुन हा आरोपी एटीएमधून लोकांचे पैसे लुटत होता. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली आहे. आरोपीने याआधी अशा प्रकाराचा काही गुन्हा केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

हिमांशू राकेश तिवारी असे आरोपीचे नाव आहे. हिमांशू एटीएमध्ये पैसे बाहेर पडण्याच्या जागेवर फेविक्किक लावायचा. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नसे. त्यामुळे ग्राहक एटीएममधून तसाच बाहेर पडत असे. त्यानंतर आरोपी हिमांशू एटीएमध्ये जाऊन फेविक्विक काढून पैसे ताब्यात घेत असे. बोरिवलीत अशा प्रकारे लूट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार मिळाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी हिमांशूचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाचे मालक शफिक सलीम शेख यांनी दुपारी 12.29 वाजता एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मशिनने पैशांचे ट्रांजेक्शन झाल्याचे दाखवले. मात्र शेख यांना पैसे मिळाले नाहीत. मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी बँकेच्या हेल्पलाइनला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांशी संपर्क साधला. कस्तुरबा पोलिसांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतली. 
त्यानंतर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 12.30 या दरम्यानचे एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना फुटेज पाहून एक तरुण एटीएमसोबत काहीतरी छेडछाड करत असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्याचा माग काढला. एटीएममधला आरोपी हिमांशू तिवारीने बोरिवली पूर्वेकडील एका ट्रॅव्हल एजन्सीला भेट दिल्याचे समजले. तो गुजरातचे तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.

“हिमांशू तिवारीची झडती घेतल्यावर, त्याच्याकडे 5,000 रुपये, फेविक्विक ग्लूने भरलेला बॉक्स सापडला. तिवारी एटीएमच्या डिस्पेंशन स्लॉटला फेविक्विक लावत होता. मशिन काम करत नसल्याचा विचार करून जेव्हा लोक निघून जात तो एटीएममध्ये जाऊन ब्लेड किंवा कटर वापरून फेविक्विक काढत असे. त्यानंतर तो तिथे जमा झालेले पैसे घेत असे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हिमांशू तिवारीला भारतीय दंड संहितेच्या कलम 379 आणि 34 अंतर्गत अटक करण्यात आली होती.

"आम्हाला संशय आहे की तिवारी एका मोठ्या टोळीचा एक भाग आहे जी केवळ मुंबईतच नाही तर इतर राज्यातही याच पद्धतीने चोरी करत आहे. त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत. त्याने अशा प्रकारे मुंबई आणि शेजारच्या भागात आणखी किती एटीएम केंद्रांना लक्ष्य केले आले आहे याची आम्ही चौकशी करत आहोत," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.