नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात

Mumbai Crime : हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अध्वर्यू रात्री वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्पीडब्रेकवरुन 30 मीटर उंच उडाली

आकाश नेटके | Updated: May 14, 2023, 01:21 PM IST
नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात title=

Mumbai Crime : भरधाव वेगाने बीएमडब्ल्यू कार चालवणे एका मर्चंट नेव्ही ऑफिसरला चांगलेच महागात पडले. भरधाव कारने कार चालकाच्याच मैत्रिणीचा जीव घेतला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जुहू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या (Juhu Police) विलेपार्ले येथे शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपघातात पश्चिम बंगालमधील एका 29 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव असलेली कार स्पीडब्रेकरवरुन उडून थेट कचऱ्याच्या गाडीवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

पोलिसांनी सांगितले गाडीतील सर्वांनी पहाटे 3 वाजेपर्यंत पार्टी केली त्यानंतर 27 वर्षीय अध्वर्यू विजय बांदेकरने आपल्या मित्रांना त्यांच्या आईच्या बीएमडब्ल्यूमध्ये हॉटेलमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. दारूच्या नशेत असलेल्या अध्वर्यू बांदेकरला अंधारात स्पीड ब्रेकर दिसला नाही. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बीएमडब्ल्यू रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाडीवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये पल्लवी भट्टाचार्य या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अध्वर्यू बांदेकर, भारती राय आणि अंकित खरे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

अध्वर्यू बांदेकर हा मर्चंट नेव्ही ऑफिसर असून तो अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला संकुलातील डीएलएच ऑर्किड टॉवरमध्ये राहतो. तर या अपघातात मृत्यूमुखी पडलेली पल्लवी भट्टाचार्य ही पश्चिम बंगालची रहिवासी होती. भारती राय ही शिमला येथील रहिवासी असून ती एका एअरलाईन्समध्ये केबिन क्रू मेंबर आहे. तर अंकित हा व्यावसायाकिचा मुलाग असल्याची माहिती समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

अध्वर्यू बांदेकर, पल्लवी पाल भट्टाचार्य (29), भारती दिलप्रसाद राय (24) आणि अंकित नरेंद्र खरे (38) हे चार मित्र साकी नाका येथील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. बांदेकर सोडून तिघेही जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. पार्टी झाल्यानंतर ते तीन वाजता बारमधून बाहेर पडले. त्यावेळी बांदेकरने आपल्या मित्रांना त्यांच्या हॉटेलमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जुहूमध्ये पोहोचल्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बांदेकरला स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ही कार मुंबई महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यांची कार 30 मीटरपर्यंत हवेत उडाली. या अपघातात शेजारी उभ्या असलेल्या रिक्षाचेही नुकसान झाले आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना रिक्षातून तांबे रुग्णालयात दाखल केले. या घटनेत पल्लवी भट्टाचार्यचा जागीच मृत्यू झाला. तर बांदेकर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतरांवरही उपचार सुरू आहेत. या अपघातात एका रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाचाही जीव वाचला आहे. भरधाव येणारी कार पाहून तो बाजूला जाऊन उभा राहिला होता.

टॅटू हटवायला आली आणि जीव गमावून बसली

पल्लवी भट्टाचार्य देखील एअरहोस्टेस असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिची नोकरी गेली होती. दुसऱ्या कंपनीत मुलाखतीनंतर तिला हातावर असलेला टॅटू काढून कामावर येण्यास सांगितले होते. हा टॅटू काढण्याच्या उपचारांसाठीच पल्लवी मुंबईत आली होती.  मात्र कार अपघातात तिचा जीव गेला. अपघाताच्या वेळी कारचा वेग 120 किमी प्रतितास इतका असल्याची माहिती देखील समोर आली आहे.