मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. 

Updated: Aug 5, 2020, 11:15 PM IST
मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. मुंबईतल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. केंद्र सरकार सर्वतोपरी राज्य सरकारला मदत करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं. 

मुंबईमध्ये आजच्या एका दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय. मस्जिद रेल्वे स्थानकात अडकलेल्या २९० प्रवाशांची एनडीआरएफने सुखरुप सुटका केली आहे. 

दरम्यान उद्यादेखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.

पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते  आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून, कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.