मुंबई : Modi Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला असून राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राणे यांनी आज आपल्या मंत्र्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, राणेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी राणे यांने जोरदार टोला लगावला आहे.
राष्ट्रपती भवनात बुधवारी पार पडलेल्या शपथविधीत सर्वात प्रथम नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्याचवेळी नारायण राणे यांना केंद्रात स्थान दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया आली असून नारायण राणे यांच्या कामाची उंची मोठी पण खाते लघु सूक्ष्म आहे. राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचे सांगत जोरदार टोला लगावला आहे. त्याचवेळी नव्याने मंत्री झालेले कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे. बाहेरून आलेल्यांनाच केंद्रात जबाबदाऱ्या दिल्या आहेत, असे राऊत म्हणाले.
भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे. त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे. आपण नवीन मंत्रांना आम्ही शुभेच्छा देतो, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेला फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिले असेल तर तो मोदी यांच्या कॅबिनेटचा अपमान आहे, असे राऊत म्हणाले. देशाचे काम करण्यासाठी मंत्रीपद दिले जाते. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे. मंत्रीपद राज्याचं आणि देशाचे असते जे विकास आणि लोकांची कामे करण्यासाठी असतात, असे संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीमध्ये हा देश चालला आहे. महागाई असेल आर्थिक विषय असतील, आरोग्यविषयक आणि असेल बेरोजगारी असेल या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे, असे ते म्हणाले.