मुंबईकर वाऱ्यावर, नगरसेवक आणि कुटूंबीयांची विशेष तपासणी!

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  

Updated: May 1, 2020, 04:27 PM IST
मुंबईकर वाऱ्यावर, नगरसेवक आणि कुटूंबीयांची विशेष तपासणी! title=

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराची कोरोना चाचणी करणं अधिक महत्त्वाचं झालं  आहे. पण आता  मुंबईकरांना वा-यावर सोडून मुंबई महानगरपालिका फक्त नगरसेवक आणि कुटूंबियांची तपासणी करताना दिसणार आहे. मुंबईकरांची घरोघरी जाऊन तपासणी न करता मुंबईकरांना वा-यावर सोडणारी मुंबई महानगरपालिका ही आता नगरसेवक आणि कुटूंबियांच्या विशेष तपासणीसाठी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश काढले आहेत. 

परंतु, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फक्त नगरसेवक नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांची चाचणी करण्याची मागणी केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नगरसेवक आणि कुटूंबियांची स्वॅब तपासणीसाठी आदेश जारी केले आहेत. 

तसेच ही तपासणी खाजगी लॅब तर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल गलगली यांनी सवाल उपस्थित केला आहे की मग मुंबईकर, अभियंता, सफाई कर्मचारी, रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर आणि परिचारिका यांची तपासणी का नाही? 

 हा पालिकेचा दुजाभाव असल्याचा आरोप करत अनिल गलगली यांनी लक्षात आणून दिले की स्वतः आयुक्तांनी लक्षणे नसल्यास कोठल्याही प्रकारची तपासणी न करण्याचे सांगितले असताना हे वेगळे आदेश का काढले जात आहे. अनिल गलगली यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि करायची असेल तर सर्व मुंबईकरांची चाचणी करा,असे सरतेशेवटी नमूद केले आहे.