मुंबई : कृष्ण जन्माष्टमीच्या मुर्हतावर ठाण्यात मनसेने दहीहंडी फोडून उत्सवाचे स्वागत केलं. आणि पुन्हा आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करू असा इशारा सरकारला दिला आहे. ठाणे पोलिसानं समोरच मनसेने दोन थर लावून हंडी फोडली. मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांना ताब्यात घेतलं. हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. सरकारने निर्बंध घातले असले तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार या मतावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ठाम आहेत. पण, आज मनसे कशाप्रकारे दहीहंडी साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतही दहीहंडी फोडली. घाटकोपर भटवाडीमध्ये सरकारच्या निषेधाची हंडी मनसेनं फोडली. मनसेने पाच थराची हंडी फोडून सरकारचा निषेध केला. सर्व गोविंदानी मास्क लावत थर लावले होते. तर सरकारची दडपशाही चालणार नाही असे म्हणत, मनसेनं वरळी नाका इथेही दहीहंडी फोडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहीहंडीबाबत नियमावली जारी केली आहे. मात्र केसेस दाखल झाल्या तरी चालेल दहीहंडी उत्सव साजरा करणार असा इशारा मनसे आधीच दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी या हंड्या फोडल्या.
एकीकडे भाजप आणि मनसेनं दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा इशारा दिलाय. तर दुसरीकडे राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्याबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.