मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सात दिवस उलटूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय निर्णय खोळंबून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर बीडमधील श्रीकांत गडाले या शेतकऱ्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे पद माझ्याकडे सोपवण्यात यावे. अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती कठीण आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे श्रीकांत गडाले यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट
श्रीकांत गडाले यांचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यावरील सत्तास्थापनेसाठीचा दबाव वाढू शकतो. गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला सरकार स्थापन झाले होते. मात्र, यंदा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपात फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलाचा आग्रह धरल्याने सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
#Maharashtra: Shrikant V Gadale, a farmer from Beed Dist. has written to the Governor stating,"till the time matter of CM post is sorted out,I should be made CM. It is a tough time for farmers due to crop damage after untimely rains.A govt in the state is needed at the earliest." pic.twitter.com/oR3PH1370V
— ANI (@ANI) November 1, 2019
दरम्यान, भाजपनेही आक्रमक भूमिका घेत एकट्यानेच सरकार स्थापन करायची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. अशावेळी सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपले आहे.