आज राज्यात ७७६० नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ३०० जणांचा मृत्यू

आज एका दिवसात राज्यात 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त...

Updated: Aug 4, 2020, 09:02 PM IST
आज राज्यात ७७६० नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ३०० जणांचा मृत्यू
संग्रहित फोटो

मुंबई : आज राज्यात 7760 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 300 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज एका दिवसात राज्यात 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 57 हजार 956 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात 2 लाख 99 हजार 356 कोरोना रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 65.37 टक्के इतका झाला आहे. 

राज्यात आजपर्यंत एकूण 16 हजार 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के इतका आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 42 हजार 151 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात 9 लाख 44 हजार 442 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 43 हजार 906 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.